ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट–समीक्षक, लेखिका आणि अनुवादक रेखा देशपांडे यांची चित्रपटविषयक विश्लेषणात्मक अशी सात पुस्तके प्रसिद्ध झाली असून भारतीय चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांचे सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक विश्लेषण मांडणाऱ्या `नायिका` या त्यांच्या पुस्तकाला 1997 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला आहे. `रुपेरी`, `चांदण्याचे कण`, `स्मिता पाटील` ही त्यांची त्याआधीची चित्रपटविषयक पुस्तके. तर `नायिका`नंतरच्या `मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास` आणि `तारामतीचा प्रवास: भारतीय चित्रपटातील स्त्री–चित्रणाची शंभर वर्षे` ही त्यांची पुस्तकेही नावाजली गेली आहेत. नुकतेच डिसेंबर 2021 मध्ये दिलीपकुमार आणि त्यांच्या कलाकारकीर्दीचे विश्लेषक विवेचन करणारे त्यांचे `दास्तान–ए–दिलीपकुमार` हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.
आजवर इंग्रजीतून मराठी, हिंदीत तसेच मराठीतून हिंदी व हिंदीतून मराठीत, कोकणीतून मराठीत असे त्यांचे 35 अनुवाद प्रसिद्ध झाले असून त्यात अगाथा ख्रिस्ती, इतिहासज्ञ जोनाथन गिल हॅरिस, जॉन एर्स्काइन, समाजशास्त्रज्ञ डॉ. फौझिया सईद, पत्रकार एजाज गुल, इरशाद मंजी, डॉ. जयंत नारळीकर, गंगाधर गाडगीळ, अर्थतज्ज्ञ (स्व.) प्रभाकर जोशी, सुनीता देशपांडे, एम. जे. अकबर, डॉ. विनया जंगले इत्यादी अनेक प्रथितयश देशी व विदेशी लेखकांच्या साहित्यकृतींचा आणि ललित साहित्याबरोबरच इतिहास, राजकारण–समाजकारण, संस्कृती अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश होतो.
जागतिक सिनेमाच्या अभ्यासक रेखा देशपांडे फीप्रेसी या आंतरराष्ट्रीय चित्रपट–समीक्षकांच्या संघटनेच्या सदस्य असून त्यांनी केरळ, कार्लोव्ही व्हॅरी (चेक रिपब्लिक), बंगळूर, कोलकाता, थर्ड आय मुंबई, ढाका (बांगलादेश), औरंगाबाद आंतररा,ट्रीय महोत्सवांत फीप्रेसी ज्युरीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच हैदराबाद बंगाली चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 90च्या दशकात दूरदर्शनसाठी `सावल्या` (मराठी), `कालचक्र`, `आनंदी गोपाल` (दोन्ही हिंदी) या मालिकांचे पटकथा–संवाद–गीत लेखन त्यंनी केले, तसेच लेखक–दिग्दर्शक अशोक राणे यांच्याबरोबर त्यांच्या `कथा तिच्या लग्नाची` या मराठी चित्रपटाच्या त्या सहलेखिकाही होत.