देशातल्या व जगभरच्या मराठी फिल्ममेकर्स व कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर लघुपटांची निर्मिती, त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग याचेही मार्गदर्शन देऊन मराठी लघुपटांचे दालन अधिक समृद्ध करावे असाही मनसुबा आयोजक ‘प्रबोधन गोरेगाव’ यांचा आहे.
मागील तीन महिन्यांत महाराष्ट्र तसेच जगाच्या कानाकोपर्यातून प्रचंड प्रतिसादासह फिल्ममेकर्सनी आपल्या लघुपटांच्या ऑनलाईन प्रवेशिका पाठवल्या आहेत. या स्पर्धात्मक महोत्सवाच्या पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या भरघोस प्रतिसादासोबत फिल्म प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख वाढविण्याबद्दल व २० मिनिटांहून जास्त लांबीच्या लघुपटांनाही संधी मिळण्याबाबत महोत्सवाकडे अनेक फिल्ममेकर्सनी विचारणा केल्या. मागील २ वर्षांचा काळ अनेकांसाठी कठीण होता. फिल्ममेकर्सनाही या काळात फिल्म्स बनविण्यात, व त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याची महोत्सवाच्या आयोजकांना जाणीव आहे. आणि म्हणून महोत्सवाने आपल्या नियमांमधे काही बदल केले आहेत.
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाने फिल्म्स प्रवेश करण्याची तारीख ६ डिसेंबर २०२१ वरून वाढवून २० डिसेंबर २०२१ केली आहे. फिल्ममेकर्सना १५ दिवस वाढवून देण्यात आहेत.
तसेच आता २० मिनिटांहून जास्त, ३० मिनिटांपर्यंत लांबीच्या फिल्म्सदेखील पाठवता येतील. या फिल्म्स महोत्सवातील स्पर्धा प्रकारांमधेही प्रवेश करू शकतात.
वरील दोन्ही बदल त्वरीत अंमलात आणण्यात येत आहेत. या बदलांबाबत महोत्सवाचे संचालक श्री. अशोक राणे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विविध भागांतून महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद व जगातील अनेक मोठ्या शहरांनमधे आयोजित होणार्या चित्रपट महोत्सवांच्या बरोबरीने प्रबोधनच्या महोत्सवातही फिल्म्स पाठवणार्या तरुण फिल्ममेकर्सचा उत्साह पाहून फार आनंद होत आहे. जगाच्या कानाकोपर्यात पोहोचलेल्या तरुण कलावंतांमधे मोठ्या प्रमाणात कला आणि ऊर्जा दडलेली आहे, आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, एक संधी मिळवून देण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आयोजक प्रयत्न करीत आहोत. या तरुण कलाकारांना योग्य मार्गदर्शन व पाठबळ या महोत्सवाद्वारे आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आजच्या नियमावलीतील बदलांनंतर आम्ही अजून जास्त फिल्ममेकर्स व कलावंतांसाठी दालन उघडत आहोत, आणि मराठी लघुपटांच्या या सोहळ्यात सहभागी करून घेत आहोत.”
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी ऑनलाईन प्रवेशिका खालील वेबसाईट लिंकवर उपलब्ध आहे → www.prabodhanisff.in/entry-form/